11th Admissions 2020-21

11th Admissions 2020-21

अकरावी प्रवेश प्रक्रिया : कॉमर्ससाठी सर्वाधिक अर्ज

PUBLISH DATE 30th June 2018

कॉमर्ससाठी सर्वाधिक अर्ज

अकरावी प्रवेशासाठी सुमारे दोन लाख ९८ हजार ४०५ जागांकरिता मुंबई विभागातून दोन लाख ३१ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये कॉमर्स शाखेसाठी सर्वाधिक एक लाख ४३ हजार ५५८ अर्ज आले आहेत. त्या खालोखाल सायन्ससाठी ६६ हजार ९७६, तर आर्ट्ससाठी १९ हजार ४५९ अर्ज दाखल झाले आहेत.

नामांकित कॉलेजांमधील अकरावी प्रवेशाचा मार्ग यंदा खडतर होणार आहे. कारण ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सामान्य गुणवत्ता यादीतील क्रमांक १६ हजार ४६२पर्यंत पोहोचला आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन हजाराने वाढली आहे. यामुळे यंदा नामांकित कॉलेजांमधील प्रवेश नव्वदीतच रेंगाळणार असल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी सायंकाळी अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १०० टक्के गुण मिळालेले चार विद्यार्थी आहेत, तर २७९१ विद्यार्थी ९५ टक्के मिळवलेले आहेत. १३ हजार ६६७ विद्यार्थी ९० ते ९४.९९ टक्के मिळवलेले आहेत. यामुळे प्रवेशाची खरी स्पर्धा या विद्यार्थ्यांमध्ये रंगणार आहे. या गुणवत्ता यादीमध्ये काही चुका असतील तर विद्यार्थ्यांनी ३ जुलै रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्याची दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. यानंतर पहिली गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. १०० टक्के गुण प्राप्त झालेल्या चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांनी सायन्स, तर कॉर्मस आणि आर्ट्स शाखेत प्रत्येकी एका विद्यार्थ्याने अर्ज केला आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी आर्ट्स शाखेला पसंती दिली आहे. आर्ट्स आणि कॉमर्स शाखेकडील वाढता कल लक्षात घेता यंदा या दोन्ही शाखांचा कटऑफ नक्कीच वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

यावर्षी सीबीएसई, आयसीएसई तसेच राज्य मंडळाच्या निकालांमध्ये ९० पेक्षा जास्त टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे यंदा कटऑफ वाढणार यात काही दुमत नाही, असे पोदार कॉलेजच्या प्राचार्य शोभना वासुदेव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे ओढा वाढत असल्याचे गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये दिसून येत आहे. यामुळे कॉमर्स कॉलेजांमध्येही प्रवेशासाठी चुरस राहील, असेही त्या म्हणाल्या.

टक्के २०१५ २०१६ २०१७ २०१८

९५ पेक्षा जास्त १,६८३ २,०६६ २,५८४ २,७९१

९० ते ९४.९९ ११,८२० १२,५२३ १०,९९१ १३,६६७

मेरीट क्र. टक्के २०१६ टक्के २०१७ टक्के २०१८

१ १०० १०० १००

१०० ९७.८३ ९९ ९८

१००० ९५.८ ९६.४ ९६.२

२००० ९५ ९५.४ ९५.४

३००० ९४.३३ ९४.६ ९४.८

४००० ९३.८ ९४ ९४.२

५००० ९३.३३ ९३.४ ९३.८

१०००० ९१.४ ९१.२ ९१.८

२०००० ८८.४ ८७.८ ८९

३०००० ८५.८ ८४.८ ८६.४