Vocational Courses Admissions

Vocational Courses Admissions

"आयटीआय" कटऑफ ९० टक्क्यांच्यावर

PUBLISH DATE 6th August 2018

इंजिनीअरिंग शाखेत पदवीला प्रवेश मिळाला नाही, तर इंजिनीअरिंग पदविका (डिप्लोमा) अर्थात पॉलिटेक्निकला प्रवेश घेणे, असा आतापर्यंतचा तंत्रशिक्षणातील ट्रेण्ड होता. आता हा ट्रेण्ड मागे पडत असून विद्यार्थ्यांची वाढती पसंती आयटीआयला मिळत आहे. त्यामुळे प्रवेशांमध्ये आयटीआयने मुसंडी मारली असून पॉलिटेक्निकपेक्षा कित्येक पटीने अधिक अर्ज आयटीआयसाठी आले आहेत.

दहावीचे निकाल लागल्यानंतर सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आयटीआयचा पर्याय सर्वांत शेवटचा असा सामान्य कयास होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो बदलत चालला आहे. या शिक्षणात होणारे बदल व हे शिक्षण झाल्यावर मिळणारा रोजगार विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेत आहे. परिणामी डिप्लोमाऐवजी आयटीआय करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. यावर्षी पॉलिटेक्निकला एक लाख ३० हजार ८०० जागा उपलब्ध असून त्यासाठी अवघे ५७ हजार ९९७ अर्ज आले आहेत. तर आयटीआयला एक लाख ३८ हजार ३१७ जागा उपलब्ध असून या जागांसाठी तब्बल तीन लाख ९५ हजार १७४ अर्ज आले आहेत. आत्तापर्यंत पार पडलेल्या चार फेऱ्यांमध्ये सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. मागील वर्षी आयटीआयच्या काही अभ्यासक्रमांचा कटऑफ हा ९० टक्क्यांच्यावर पोहोचला होता. यामुळे आयटीआय हा पॉलिटेक्निकला पर्याय ठरू लागला आहे. दहावीचा निकाल वाढला की पॉलिटेक्निककडे जाणाऱ्यांची संख्या वाढते असा साधारण कयास होता. मात्र आता तो कल आयटीआयकडे वाढत असल्याचे समोर येत आहे.

या अभ्यासक्रमांना मागणी

 विद्यार्थी आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, डिझेल मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट आदी अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत.