Entrance Exams

Entrance Exams

जेईई अ‍ॅडव्हान्स्ड २०२०परीक्षाही स्थगित

PUBLISH DATE 2nd April 2020

करोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि देशभरातील लॉकडाऊनमुळे एप्रिलपर्यंत परीक्षा याआधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता मेच्या परीक्षाही पुढे ढकलल्या जात आहेत.

काही दिवसांपूर्वी एनटीएने सामायिक प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन एप्रिल 2020) पुढे ढकलली होती. आता आयआयटी दिल्लीनेही जेईई अ‍ॅडव्हान्स्डला लांबणीवर टाकले आहे. देशातील सर्व आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई मेन आणि अॅडव्हान्स्ड परीक्षा घेतल्या जातात.

गेले दोन दिवस जेईई अॅडव्हान्स्डबद्दल चर्चा होती. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा १७ मे रोजी होणार होती. पण अद्याप बोर्डाची परीक्षा संपलेली नाही, जेईई मेनची कुठली नवी तारीखदेखील आलेली नाही. या पार्श्वभूमीवर अॅडव्हान्स्ड परीक्षेबाबतचा निर्णय दिल्ली आयआयटीने घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले होते की या परीक्षा मेच्या मध्यापर्यंत संपतील.

जेईई मेनचा निकाल लागत नाही आणि गुणवत्ता यादी तयार होत नाही, तोवर अॅडव्हान्स्ड परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयआयटी दिल्लीने जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर एक परिपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की 'जेईई मेन २०२० एप्रिलची परीक्षा कोव्हिड -१९ च्या फैलावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी जेईई अॅडव्हान्स्ड २०२० ही रविवारी १७ मे २०२० रोजी होणार होती, ती स्थगित केली जात आहे. जेईई अॅडव्हान्स्डच्या नवीन तारीखेची घोषणा जेईई मेन 2020 च्या नंतर केली जाईल.'

JEE Main चं आयोजन पूर्वी सीबीएसई बोर्डामार्फत केलं जाई. आता ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाते. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची जबाबदारी देशातील कुठल्याही एका आयआयटीकडे असते. यावर्षी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी आयआयटी दिल्ली कडे आहे.